आत्ताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. जयपूरमध्ये रसायनाच्या टँकरचा स्फोट झाल्याने चौघांचा जळून मृत्यू झाला असून जवळपास 20 वाहनांना आग लागली आहे. या दुर्घटनेत 30 जण भाजले असून एक कारखानाही जळाला आहे. ही भीषण घटना आज सकाळी सहाच्या सुमारासा घडली.
दरम्यान अजमेर महामार्ग बंद करण्यात आला आहे. राजस्थानच्या जयपूरमधील दिल्ली पब्लिक स्कूलसमोर रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट झाला. अजमेर हायवेवर केमिकलमुळे लागलेल्या आगीत चार जण जिवंत जळाले. सकाळी 6 च्या सुमारास झालेल्या या अपघातानंतर आता बचावकार्य सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , सुमारे 40 बंबामार्फत आग विझवली आहे. अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचल्या आहेत. मदतकार्य सुरू आहे. आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे आणि या घटनेत 23 ते 24 जण जखमी झाले आहेत.
अग्निशमन दलाच्या धाडसी परिश्रमानंतर आग आटोक्यात आली. सीएनजी टँकर अपघातातील मृत्यूची अधिकृत आकडेवारी जयपूरचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली असून आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला आहे. मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली असून रस्त्यावरून ये-जा करणारी वाहने, रस्त्यालगत उभी केलेली वाहने आणि पेट्रोल पंप, एकमेकांना धडकून वाहने पेटली आणि गोदामांचे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
पोलीस प्रशासन घटनास्थळी हजर असून बचावकार्य आणि मदतकार्य वेगाने पुर्णत्वाकडे जात आहे. राजस्थानच्या जयपूर भागातील भानक्रोटा परिसरात हा भीषण अपघात झाला. यात लागलेल्या आगीत चौघांचा मृत्यू झाला असून जवळपास तीस लोक होरपळले आहेत, आग एवढी भीषण होती की, ज्वाळांनी या भागात धुराळा झाला होता. तसेच आगीने वेगाने वेढा घेतला.