तामिळनाडूमधून एक मोठी बातमी समोर आली आहे . तामिळनाडूमधील फटाके बनवणाऱ्या कारखान्यामध्ये स्फोट झाला. या स्फोटामध्ये सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनं सर्वत्र खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , कारखान्यामध्ये फटाके बनवण्याचे काम सुरु असताना हा स्फोट झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे . हा स्फोट तामिळनाडूच्या विरुधुनगरमधील सत्तूर भागात झाला आहे.
स्थानिक पोलिसांनी या भीषण स्फोटासंबंधित माहिती माध्यमांना दिली. त्या माहितीनुसार, शनिवारी (४ जानेवारी) तामिळनाडूमध्ये एका फटाके बनवणाऱ्या कारखान्यामध्ये मोठा स्फोट झाला. या स्फोटामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात झाला तेव्हा कारखान्यामध्ये अनेक कर्मचारी काम करत होते.
स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलासह पोलीसही देखील घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आग विझवून बचाव कार्याला सुरुवात केली. त्यांनी जखमींना बाहेर काढून उपचाराकरिता जवळच्या रुग्णालयात दाखल केले. दरम्यान या स्फोटाचे कारण अजूनही समोर आलेले नाही.