मुंबई : मुंबईच्या पश्चिम उपनगरात असणाऱ्या मालाडमध्ये शनिवारी सकाळी भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मालाड-दिंडोशी दरम्यान असणाऱ्या खडकपाडा परिसरात असणाऱ्या फर्निचरच्या गोदामांमध्ये ही आग लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. एका गोदामात लागलेली ही आग आजुबाजूला पसरत गेली आणि आगीने भीषण स्वरुप धारण केले आहे. आकाशात काळ्या धुराचा प्रचंड लोट उठल्याचे पाहायला मिळत आहे.
आग लागल्याची वर्दी मिळताच अग्मिशमन दलाच्या चार ते पाच गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. सध्या अग्निशमन दलाकडून आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग लागलेल्या भागात आजुबाजूला मोठ्याप्रमाणावर झोपडपट्टी आणि फर्निचरची दुकाने असल्याने ही आग आणखी पसरण्याचा धोका आहे.
या पार्श्वभूमीवर सध्या दिंडोशी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांच्याकडून सुरक्षेच्या कारणास्तव आजुबाजूचा परिसर खाली केला जात आहे. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
मात्र, या आगीत फर्निचरची गोदामं जळून खाक झाल्याने मोठ्याप्रमाणावर वित्तहानी झाल्याचा अंदाज आहे. सध्या अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.