शिंदेंच्या शिवसेनेत सर्वाधिक बंडखोरी, बड्या नेत्यासह २०० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
शिंदेंच्या शिवसेनेत सर्वाधिक बंडखोरी, बड्या नेत्यासह २०० पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
img
वैष्णवी सांगळे
मुंबई महानगर पालिका निवडणुकीदरम्यान मोठी राजकीय घडामोड घडली आहे. महापालिका निवडणुकीचा अर्ज मागे घेण्यासाठी अवघे एक तास शिल्लक असताना महायुतीच्या नेत्यांची धाकधूक चांगलीच वाढल्याचं दिसतेय. यामध्ये सर्वाधिक बंडखोरी ही शिंदेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. मुंबईत शिंदेंच्या शिवसेनेतून 35 ते 40 ठिकाणी बंडखोरी झाली आहे आणि प्रत्येकालाच आपण निवडून येण्याचा विश्वास आहे. त्यामुळे महायुतीच्या नेत्यांसमोरील डोकेदुखी मात्र वाढली आहे. तर त्याचवेळी गोरेगाव दिंडोशीमध्ये विभागप्रमुखासह २०० जणांनी राजीनामा दिला आहे. 



पक्षात नव्याने येणाऱ्यांना पदे आणि उमेदवारी दिल्यामुळे गोरेगावमध्ये जुने शिवसैनिक नाराज आहेत. पक्षाने उमेदवारी न दिल्याने शेकडो पदाधिकारी नाराज झालेत. प्रभाग क्रमांक ५४ शिवसेना शिंदे गटाकडे असतानाही विधानसभा मतदारसंघ भाजपाला सोपवल्याने पदाधिकाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. विधानसभा विभाग प्रमुख गणेश शिंदे यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली.

शिंदेंच्या शिवसेनेचे गोरेगाव आणि दिंडोशी विधानसभा प्रमुख गणेश शिंदे यांची मुलगी श्रेया शिंदे हिने अपक्ष अर्ज भरला आहे आणि ती माघार घेणार नाही अशी गणेश शिंदे यांची भूमिका आहे.त्यामुळे नाराज झालेल्या विभागप्रमुख गणेश शिंदे यांनी राजीनामा दिला. त्यानंतर याठिकाणी पदाधिकाऱ्यांचे राजीनामा सत्र सुरू झाले. गणेश शिंदे यांच्यानंतर महिला उपविभाग प्रमुख सोनल हडकर यांनीही राजीनामा दिला. शाखा समन्वयक आणि २०० पेक्षा अधिक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामा दिला. स्थानिक कार्यकर्त्यांकडे वरिष्ठ नेतृत्वाने दुर्लक्ष केल्याचा आरोप या सर्वांनी केला.

या सामूहिक राजीनाम्यांमुळे गोरेगाव विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात कमकुवत होण्याची शक्यता असून प्रभाग ५१ मधील शिवसेना शिंदे गटाचे बंडखोर उमेदवार श्रेया गणेश शिंदे यांच्या उमेदवारीमुळे शिंदे गटाच्या वर्षा स्वप्निल टेंभवलकर यांच्यावर थेट परिणाम आगामी निवडणुकीवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय वर्तुळात या घडामोडींची जोरदार चर्चा सुरू असून शिवसेना शिंदे गट नेतृत्वाकडून यावर काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group