मुंबईतल्या कुर्ल्यामध्ये बेस्टच्या बसला भीषण अपघात झाला. भरधाव बस थेट मार्केटमध्ये घुसली. या बसने अनेक वाहनांना चिरडलं.
कुर्ला पश्चिम येथे सोमवारी रात्री झालेल्या अपघातामुळे मुंबईकर हादरले असून या अपघातात आत्तापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे . या दुर्घटनेनंतर अनेक व्हिडीओही समोर आले असून त्यामध्ये या अपघाताचा थरार पाहायला मिळत आहे.
या अपघातामध्ये आतापर्यंत ७ जणांचा मृत्यू तर 2९ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातातील जखमींवर भाभा आणि सायन रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या अपघाताच्या तपासातून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
बसध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता ही धक्कादायक माहिती चौकशीनंतर समोर आली आहे. मात्र बसचा वेग आपोआप वाढू लागला आणि ब्रेक फेल झाल्याचा चालकाने दावा केला होता. बस चालक हा कंत्राटाद्वारे नेमण्यात आला होता. चालक संजय मोरे (५४ वर्षे) काही दिवसांपूर्वी म्हणजेच १ डिसेंबर रोजी कामावर रूजू झाल्याची माहिती समोर आली आहे. कंत्राटपदावर भरती झालेला चालक आधी खासगी बस चालवत होता. त्याला मोठ्या बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुर्ल्यातील बेस्ट बस अपघातातील चालकाला बस चालवण्याचा कोणताही अनुभव नव्हता. तो कंत्राटी चालक म्हणून १ डिसेंबरला कामावर रुजू झाला होता. त्याने सोमवारी पहिल्यांदाच बेस्ट बस चालवली. हा चालक लहान वाहनं चालवायचा. मोठी वाहनं चालवण्याचा त्याला कोणताही अनुभव नव्हता.
कुर्ला बस अपघाताप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू आहे. अपघातग्रस्त बसमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड झाला नसल्याचे तपासातून उघड झाले. तसंच, चालकाने मद्यपान केलेले नव्हते. अपघातग्रस्त बस चालक संजय मोरेला अटक करण्यात आली असून त्याची पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे. ड्रायव्हरविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे. संजय मोरेची नेमणूक करणाऱ्यांची चौकशी होणार आहे.