गणेशोत्सवाच्या दहा दिवसांच्या जल्लोषानंतर आज राज्यभरात बाप्पाला निरोप दिला जात आहे. सकाळपासूनच राज्यभरात विसर्जन मिरवणुकांना सुरुवात झाली असून ढोल-ताशांचा गजर, गुलालाची उधळण आणि "गणपती बाप्पा मोरया"च्या घोषणांनी वातावरण दुमदुमले आहे.
दरम्यान मुंबईतील लालबाग परिसरातून दुर्दैवी घटना समोर आली आहे. लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध मार्गावर २ वर्षीय चिमुकलीचा अपघाती मृत्यू झाला आहे. तर, ११ वर्षीय मुलगा गंभीर जखमी आहे. ही ह्रदयद्रावक घटना शनिवारी पहाटेच्या सुमारास घडली.
अज्ञात व्यक्ती भरधाव वाहनाने विरूद्ध दिशेनं आला. त्या व्यक्तीने झोपलेल्या मुलांना धडक दिली. या धडकेत चिमुकली रक्तबंबाळ अवस्थेत जागीच मृत्यूमुखी पडली. तर जखमी मुलावर तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
शनिवारी पहाटे ३ ते ४च्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती पोलिसांना दिली. चंद्रा वजणदार असे मृत मुलीचे नाव आहे. तर, शैलू वजणदार असे गंभीर जखमी असलेल्या मुलाचे नाव आहे. दोन्ही मुले लालबाग राजाच्या मुख्यप्रवेशद्वाराच्या विरूद्ध असलेल्या रस्त्याच्या कडेला झोपले होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे.