अक्कलकोट तालुक्यातील हन्नूर गावात मन हेलावणारी घटना समोर आली आहे. नातवाला अखेरचा निरोप देताना आजीनेही प्राण सोडले. एकाच दिवशी एकाच घरात दोघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. हन्नूर गावात कुटुंबावर काळाने घाला घातला, अपघातात एकुलत्या एक नातवाचा मृत्यू झाला, नातवाचा मृत्यू झाल्याने आजीला मोठा धक्का बसला. हा धक्का पचवू शकली नाही.
ही हृदयद्रावक घटना हन्नूर गावातील भीमाशंकर माळप्पा व्हनमाने यांच्या कुटुंबात घडली. भीमाशंकर हे वाहन चालक म्हणून काम करतात. त्यांच्या कुटुंबात पत्नी, मुलगा, मुलगी आणि वयोवृद्ध आई होते. त्यांच्या कुटुंबातील आदित्य व्हनमाने, हा चपळगाव येथील ग्रामीण विद्या विकास विद्यालयात नववीत शिकत होता. बुधवारी शाळा सुटल्यानंतर आदित्य घरी जाण्यासाठी एका दुचाकीस्वाराला गावाकडे सोडण्याची विनंती करत होता.
दुचाकीवर बसून तो निघाला होता, पण अचानक त्या गाडीतील पेट्रोल संपले. त्यानंतर दोघे पेट्रोल भरून पुन्हा निघाले असता समोरून आलेल्या एका कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला, तर आदित्यचा जागीच मृत्यू झाला. आदित्यचा मृतदेह गावात आणल्यानंतर कुटुंबीयांवर शोककळा पसरली.
स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी जेव्हा सर्व मंडळी जमली, तेव्हा आदित्यची आजी जनाबाई व्हनमाने यांनी हा प्रसंग पाहिला. आपल्या नातवाचा मृतदेह पाहून त्या असहाय झाल्या आणि जागीच कोसळल्या. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र नातवाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. एकाच दिवशी नातवाचा आणि आजीचा मृत्यू झाल्याने हन्नूर गावात आणि परिसरात शोककळा पसरली आहे.