बिहारमधील मुझफ्फरपूरमध्ये भीषण अपघात झालाय. मीनापूर पोलीस स्टेशन परिसरातील दरीपट्टीजवळ शिवहर राज्य महामार्गावर विटांनी भरलेली ट्रॅक्टर ट्रोली आणि मालवाहू पिकअपची जोरदार टक्कर झाली. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, एका ६ वर्षीय मुलीचा रूग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. अपघातानंतर मृतदेह रस्त्यावर विखुरल्याचं भीषण दृश्य रस्त्यावर पहायला मिळालं.

पिकअपमधील सर्व लोक मीनापूर ब्लॉकमधील होते. समस्तीपूर जिल्ह्यातील येउरा येथील मेळाव्याला जाऊन ते पुन्हा परतीच्या मार्गावर होते. मात्र, गावी पोहोचण्याआधीच शुक्रवारी सायंकाळी महामार्गावर विटांनी भरलेल्या ट्रॅक्टर ट्रोली आणि पिकअप वाहनाचा अपघात घडला.
प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, अपघात घडल्यानंतर पिकअपमधील लोक दुरवर फेकले गेले होते. सर्वांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. ट्रॅक्टर अन् पिकअपचा चुराडा झाला. अपघात घडल्यानंतर दोन्ही वाहनाच्या चालकांनी घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरूवात केली. सध्या या घटनेचा तपास सुरू आहे.