सुनील शेट्टीने आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. एखाद्या बॉलिवूड अभिनेत्याने आपल्या वैयक्तिक आणि प्रसिद्धी हक्कांचे रक्षण करण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. सुनील शेट्टी याच्याआधी अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय बच्चन, करण जोहर, जॅकी श्रॉफ, अनिल कपूर आणि अमिताभ बच्चन यांनी देखील न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे.

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता सुनील शेट्टी एका प्रकरणामुळे चर्चेत आहे. सुनील शेट्टीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. अभिनेत्याने असा दावा केला आहे की, अनेक सोशल मीडिया पेज आणि वेबसाइट्सवर सुनील शेट्टी आणि अभिनेत्याच्या नातीच्या फोटोंचा वापर कोणत्याही परवानगीशिवाय व्यवसायाचा प्रचार करण्यासाठी करण्यात येत आहे.
सुनील शेट्टी याने त्याच्या अंतरिम अर्जात न्यायालयाला विनंती केली आहे की, अशा सर्व वेबसाइटना त्यांचे फोटो तात्काळ काढून टाकण्याचे आदेश द्यावेत आणि भविष्यात त्यांचा वापर करणं थांबवावा. अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. न्यायालयाने या याचिकेवरील निकाल राखून ठेवला आहे. याप्रकरणी शुक्रवारी न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या एकलपिठासमोर सुनावणी घेण्यात आली.
शेट्टी आणि त्यांच्या नातीच्या बनावट प्रतिमा काही वेबसाइटवर आहेत. त्यामुळे ते तात्काळ हटवण्यात यावे असी मागणी असून न्यायालयाने हा युक्तिवाद ऐकून घेत निकाल राखून ठेवला आहे. आता याप्रकरणी पुढे काय होणार पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.