नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ताहाराबाद - अंतापूर मार्गावर गुरुवारी रात्री सव्वा आठ वाजेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला. मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकअप व्हॅन आणि टाटा कार यांच्यात समोरासमोर झालेल्या धडकेत तिघांचा जागीच मृत्यू झाला असून, १० ते १२ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पिकअप वाहन चालकाने आयशर वाहनाला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करत असताना नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारच्याा समोरील भागाचा चक्काचूर झाला आहे. यात तिघांचा मृत्यू झाला आहे.
मृतांमध्ये तान्हाजी सोनवणे, शंकर आबीस, आणि आशा सोनवणे यांचा समावेश आहे. सर्व मृत आणि जखमी मजूर हे सटाणा तालुक्यातील हनुमंत पाडा, बोरदैवत आणि असेरा परिसरातील रहिवासी असल्याची माहिती आहे. अपघातानंतर ताहाराबाद - अंतापूर मार्गावर काही वेळ वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करून जखमींना वाहनांद्वारे शासकीय रुग्णालयात हलवले. गंभीर जखमींपैकी दोन मजुरांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.