नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा कमावण्याचे आमिष दाखवून एका इसमासह साक्षीदारांची सव्वादोन कोटी रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी एका महिलेसह तिच्या साथीदारांसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी पुरुष व इतर साक्षीदार घरी होते. रिलायन्स कॅपिटलचे प्रतिनिधी असल्याचे सांगून आरोपी अंजली मेहता व तिच्या अनोळखी साथीदारांनी संगनमत करून फिर्यादीशी संपर्क साधला. त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात नफा कमावण्याचे आमिष दाखवून आरोपींनी फिर्यादीचा विश्वास संपादन केला.
त्यानंतर आरोपींनी संगनमत करून फिर्यादी यांना वेळोवेळी वेगवेगळ्या बँक खात्यांत पैसे भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने वेळोवेळी 2 कोटी 24 लाख 93 हजार रुपयांची गुंतवणूक केली. हा प्रकार जून ते दि. 17 सप्टेंबर 2025 या कालावधीत घडला.
पैसे गुंतवूनही नफा पण नाही व मूळ रक्कमही परत केली नाही, यावरून फसवणूक झाल्याची बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादीने सायबर पोलीस ठाण्यात अंजली मेहता, तिचे अनोळखी साथीदार व वेगवेगळे बँक अकाऊंटधारक यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस उपनिरीक्षक पिसे करीत आहेत.