नाशिक रोड (भ्रमर प्रतिनिधी): दसऱ्यासारख्या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात शांतता आणि कायदा सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी पोलिस यंत्रणेवर असताना, नाशिक रोड परिसरात मात्र तीन सराईत युवकांनी पहाटेच्या सुमारास कोयत्याच्या साहाय्याने गाड्यांच्या काचा फोडून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवळाली गावातील मालधक्का परिसरातून काळ्या रंगाच्या एक्टिवा दुचाकीवरून आलेल्या तिघा संशयितांनी पहाटे तीनच्या सुमारास दहशतीचा खेळ सुरू केला. मनपा कर्मचारी बिराडे यांच्या स्विफ्ट डिझायर गाडीच्या काचा कोयत्याने फोडल्यानंतर हे तिघे धोंगडे नगर आणि डावखर नगरकडे वळले.
उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धोंगडे नगर परिसरात प्रशांत भालेराव यांच्या स्विफ्ट डिझायर, तसेच डावखर वाडी येथील अनिल बाबाजी डावखर यांच्या वर्णा आणि बांधकाम व्यावसायिक जाधव यांच्या मारुती 800 या चारचाकी वाहनांच्या काचा देखील फोडण्यात आल्या. काही मिनिटांतच या तिघांनी एकूण चार गाड्यांवर कोयत्यांनी हल्ला करत परिसरात दहशत निर्माण केली.
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिक घराबाहेर निघत असताना अशा घटना घडणे चिंताजनक आहे. विशेष म्हणजे पोलिस गस्त आणि देखरेख असल्याचा दावा करत असतानाही, या तिघांनी सलग अनेक गाड्या फोडून पोलीस यंत्रणेला चकवा दिला. घटनेनंतर बराच वेळ उलटूनही संशयितांचा माग काढण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.
नागरिकांनी पोलिसांच्या निष्क्रियतेवर तीव्र नाराजी व्यक्त केली असून, "दसऱ्याच्या दिवशीच गुन्हेगार मोकाट फिरत असतील, तर सर्वसामान्य नागरिक सुरक्षित कसे राहणार?" असा सवाल परिसरातील रहिवाशांकडून उपस्थित केला जात आहे.
दरम्यान, काळ्या रंगाच्या एक्टिवा दुचाकीवरून आलेल्या या संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक तैनात केले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मात्र, घटनास्थळी घडलेल्या प्रकाराने पोलिसांच्या गस्त आणि गुप्तचर यंत्रणेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण केला आहे.