नाशिक पोलिस आयुक्तालयातील भद्रकाली पोलिस ठाण्याच्या दुय्यम निरीक्षकाची इंदिरानगर पोलिस ठाण्यात नेमणूक करण्यासाठी तब्बल पस्तीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. याबाबत नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या अंमलदाराने मुंबई नाका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून दोन संशयितांविरुद्ध सोमवारी (दि.२८) गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यामुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून, एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिस आयुक्तालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नाशिकरोड पोलिस ठाण्यातील एका अंमलदाराच्या फिर्यादीनुसार नितीन सपकाळे व सागर पांगरे-पाटील या दोन संशयितांविरुद्ध खंडणीचा गुन्हा नोंद आहे. २४ जुलै रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास संशयित सपकाळे याने पाटीलसोबत संगनमत करून अंमलदाराला 'व्हॉटसॲप कॉल' केला. त्यावेळी संशयिताने 'आपली वरपर्यंत ओळख असून, भद्रकालीचे सध्याच्या दुय्यम निरीक्षकांची इंदिरानगर पोलिस ठाण्यात 'प्रभारी' पदावर बदली करून देतो. त्यासाठी प्रत्यक्ष भेटून बोलू', असे सांगितले.
२५ जुलै रोजी सकाळी साडेदहा वाजता सपकाळे चांडक सर्कल परिसरात आला. त्याने अंमलदारासह निरीक्षकांना बोलावून घेतले. त्यावेळी चुंचाळे पोलिस ठाण्यात दोन अंमलदारही हजर होते. त्यावेळी संशयित पाटील हा 'तुम्ही पैसे दिले नाहीत, तर मी कोठेही चांगल्या ठिकाणी बदली होऊ देणार नाही', असे सांगून निघून गेला. त्या दिवशी रात्री सव्वाआठ वाजता सपकाळेच्या मोबाइलवर अंमलदाराने फोन करून 'रेकॉर्डिंग' केली. तेव्हा 'दुसरे निरीक्षक पस्तीस द्यायला तयार आहेत. मी पाच कमी करतो. तीसपेक्षा कमी होणार नाही. जर साहेब पंचवीसच्या वर द्यायला तयार नसतील, तर बदलीचे काम होणार नाही', असा दावा सपकाळेने केला.
त्यावरून अंमलदाराने पुराव्यांनिशी पोलिस ठाणे गाठत फिर्याद दिली आहे. या प्रकारानंतर मुंबई नाका पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले असून, तो बांधकाम व्यवसाय क्षेत्राशी संलग्न असल्याचे कळते. दरम्यान, या प्रकाराबाबत पोलिस आयुक्तालयाने कमालीची गोपनीयता बाळगली असून, पोलिस दलातील काहीजण याप्रकरणात सहभागी आहेत का, यासंदर्भातही तपास सुरू आहे.
निरीक्षकांची सेटलमेंट
पोलिस आयुक्तांनी महिन्याभरापूर्वीच शहरातील सात पोलिस ठाण्याच्या 'प्रभारी' निरीक्षकांची बदली केली आहे. त्यानुसार नवीन निरीक्षकांनी पोलिस ठाणेनिहाय कामगिरींना सुरुवात केली असून अंमलदारांच्याही बदल्यांची 'सेटिंग' अद्याप सुरू आहे. त्यातच पोलिस ठाणे, गुन्हे शाखा, पथकांतील 'कलेक्टरां'मध्ये झालेले मतभेद चव्हाट्यावर आले असून, वरिष्ठ निरीक्षकांचेही 'मनोमिलन' अद्याप सुरूच आहे. त्यातच एका निरीक्षकाच्या बदलीसाठी थेट पस्तीस लाखांची मागणी होणे, त्यातच काही अधिकाऱ्यांच्या 'मर्जीतल्या' अंमलदाराला संपर्क साधला जाणे, संशयितांना भेटण्यासाठी जाणारे अंमलदारही 'मर्जीतले' असणे, हा प्रकारही संशयास्पद आहे. त्यामुळे आयुक्तालयाने याप्रकरणी सखोल तपासाला सुरुवात केल्याचे कळते.