प्रकाश लोंढेच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. प्रकाश लोंढे टोळीवर मोक्का लावण्यात आला असून सर्वच मालमत्ता ‘सील’ होणार आहे. सातपूरच्या आयटीआय सिग्नलजवळील ‘ऑरा’ बारमध्ये ‘प्रोटेक्शन मनी’तून गोळीबार करण्यासह हप्ता वसुली, कब्जा, खंडणी, फसवणूक, दहशत निर्माण करणाऱ्या प्रकाश लोंढेच्या टोळीवर मोक्का अंतर्गत आता कारवाई करण्यात आली आहे. आता नव्याने मोक्कांतर्गत पुन्हा स्वतंत्र तपास होणार असून, लोंढे टोळीला कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग कठीण झाला आहे.

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये सोमवारी (दि. २७) सायंकाळी प्रकाश लोंढे ग्रुपच्या सतरा जणांच्या टोळीवरील मोक्काच्या प्रस्तावावर त्यांनी स्वाक्षरी केली. त्यामुळे येत्या काळात लोंढे टोळीची शहर व जिल्ह्यातील एकूण मालमत्ता जप्त करण्याची कार्यवाही केली जाणार आहे. त्यासोबतच टोळीवर मोक्कांतर्गत कारवाईचा निर्णय आयुक्तालयाने घेतला आहे.
संशयितांविरुद्ध गोळीबार, खंडणी, हप्ता वसुलीसह कब्जा करणे, दहशतीसह इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे शहरातील विविध पोलीस ठाण्यात नोंद आहेत. त्यामुळे टोळीवर मोक्कांतर्गत कारवाईचा निर्णय आयुक्तालयाने घेतला आहे. ऑरा बारमधील राड्यानंतर झालेल्या गोळीबार प्रकरणात संशयित भूषण प्रकाश लोंढे अजूनही पसार आहे.