नाशिक : मनी लॉण्डरिंगमध्ये अटक करण्याची भीती दाखवून दहा लाखांची फसवणूक
नाशिक : मनी लॉण्डरिंगमध्ये अटक करण्याची भीती दाखवून दहा लाखांची फसवणूक
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मनी लॉण्डरिंग केसमध्ये सहभाग आढळून आल्याने अटक करण्याची भीती दाखवून एका इसमाला दहा लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घालण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे नाशिक येथे राहतात. त्यांना सायबर भामट्यांनी वेगवेगळ्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकांवरून व्हिडिओ कॉल, व्हाईस कॉल करून बोलणार्‍या व चॅटिंग करणार्‍या व्यक्तींनी ते कुलाबा पोलीस ठाण्यात बोलत असल्याचे भासविले, तसेच तुम्ही नरेश गोयल मनी लॉण्डरिंग केसमध्ये सहभागी आहात, असे सांगून त्या केसमध्ये फिर्यादीला अटक करण्याचा धाक दाखविला. 

त्याचप्रमाणे या केसच्या तपासाच्या नावाखाली करूर वैश्य बँकेच्या खात्यात सात लाख रुपये व आयडीबीआय बँकेच्या खात्यात तीन लाख रुपये असे एकूण दहा लाख रुपये आरोपींनी सांगितलेल्या खात्यांमध्ये ट्रान्स्फर करण्यास भाग पाडून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार दि. 14 ते 19 नोव्हेंबरदरम्यान फिर्यादीच्या राहत्या घरी मोबाईल फोन व इंटरनेटद्वारे घडला.

या प्रकरणी चॅटिंग करणारे इसम व पैसे वर्ग झालेले बँक खातेदार यांच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक पिसे करीत आहेत.
nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group