नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : रस्त्याने पायी जात असताना अडवून एका दाम्पत्याने मायलेकींचा विनयभंग केल्याची घटना भद्रकाली परिसरात घडली.
याबाबत पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की दि. 8 डिसेंबर रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास आई व बहिणीसमवेत भद्रकाली परिसरातील हॉटेल सायंताराजवळून पायी जात होत्या. त्यावेळी आरोपी वैभव परदेशी, त्याचे वडील, पत्नी व आई (सर्व रा. चित्रकूट सोसायटी, वडाळा-पाथर्डी रोड) हे दोन दुचाकी गाड्यांवरून तेथे आले.
वैभव परदेशीने त्याची दुचाकी आडवी लावून तरुणीला पुढे जाण्यास प्रतिबंध केला. नंतर चौघांनी गाडीवरून उतरून फिर्यादी तरुणीजवळ येऊन तिला शिवीगाळ केली. वैभवची पत्नी फिर्यादी तरुणीच्या आईला मारण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून गेली. त्याच वेळी वैभव परदेशीने फिर्यादी तरुणीच्या स्त्रीमनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले.
या प्रकरणी परदेशी कुटुंबीयांविरुद्ध पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार ए. टी. जुंद्रे करीत आहेत.