मनमाड-नांदगाव रोडवर हिसवळ शिवारात सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास दोन मोटर सायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात दोन जण ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर मनमाड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून गंभीर मार असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी मालेगाव येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेने पानेवाडी आणि जळगांव बुद्रुक गावावर शोककळा पसरली.
हे ही वाचा
गेल्या काही दिवसात मनमाड-नांदगावसह मनमाड-येवला रस्त्यावर अपघाताचे प्रमाण वाढले आहे. सोमवारी सायंकाळी नांदगाव तालुक्यातील हिसवळ शिवारात हा भीषण अपघात घडला. दोन मोटरसायकल समोरासमोर धडकून झालेल्या भीषण दुर्घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्या पाय, हात डोक्याला मार लागला आहे.एमएच-४१ बीजी ८२२४ आणि एचएच-४१, बीडी- ६३१६ या दोन दुचाकीमध्ये समोरासमोर धडक झाली. अपघाताची भीषणता इतकी मोठी होती ही घटनास्थळी उपस्थित नागरिक घाबरून गेले.
हे ही वाचा
या अपघातात फकीरा भागा गांगुर्डे, (वय ३०, रा. पानेवाडी) आणि दिगंबर तुकाराम अहिरे, (वय ३९, रा. जळगांव बुद्रुक) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर पाठीमागे बसलेले मधुकर रंगनाथ सानप, (वय ४५, रा. जळगांव बुद्रुक) व सचिन (ढवळ्या) श्रावण पवार, (वय १९, रा. पानेवाडी) हे गंभीर जखमी असून त्यांना तातडीने मनमाड नंतर मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी हरवण्यात आले. दरम्यान पानेवाडी येथील मयत फकीरा गांगुर्डे याच्या पश्चात आई, पत्नी आणि सहा मुली असा परिवार आहे. तर जळगांव बुद्रुक येथील मयत दिगंबर अहिरे यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी आणि तीन मुली, एक मुलगा असा परिवार आहे. या घटनेमुळे दोन्ही गावसह तालुक्याच्या ग्रामीण भागात शोककळा पसरली.