समृद्धी महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडलीय. समृद्धी महामार्गावर सिन्नर तालुक्यातील पाटोळे शिवारातील चॅनल क्रमांक ५७१.७ येथे मुंबईकडून सिन्नरच्या दिशेने जाणाऱ्या कारचे पुढील टायर फुटल्याने भीषण अपघात होऊन बहीण-भावाचा मृत्यू झाला तर आठ जण गंभीर जखमी झाले आहे. रविवारी (दि. १४) दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.
कल्याण येथील ११ प्रवाशी किया कार क्र. एमएच ०५ एफबी ७२५६ ने रविवारी सकाळी सिन्नर तालुक्यातील फर्दापूर येथे एका विवाह सोहळ्यासाठी निघाले होते. सिन्नरच्या पाटोळे परिसरात आल्यावर कारच्या डाव्या बाजूचे टायर फुटल्यामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील कार पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनावर जाऊन धडकली आणि हा अपघात झाला.
या अपघातात नीलेश विजय बुकाणे (३८)रा. मिलींदनगर, कल्याण आणि वैशाली सचिन घुसळे (३५) रा. चिंचपाडा, कल्याण या दोघा बहिण-भावाचा दुर्दैची मृत्यू झाला आहे. कारमधील छाया नीलेश बुकणे (३०), सचिन घुसळे (४०), अर्णव नीलेश बुक (१४), गोल्डी नीलेश बुकणे (१०), सुयश घुसळे (३), निरव गायकवाड (१०), मनस्वी गायकवाड (५), साची सचिन घुसळे (९) हे गंभीर जखमी झाले आहेत. चालक प्रशांत शिरसाट (३२) किरकोळ जखमी झाले आहेत.
जखमींवर उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघाताची माहिती सिन्नर पोलीस ठाण्यास देण्यात आल्यानंतर अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला.