नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) :- मोबाईलमध्ये आलेल्या एपीके लिंकला क्लिक केल्याने अॅप डाऊनलोड होऊन महिलेसह दोघांची 26 लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी, की अज्ञात आरोपीने फिर्यादी व एका महिलेला त्यांच्या मोबाईलमध्ये एपीके लिंक पाठवून आरटीओ चलन अॅप डाऊनलोड करण्यास भाग पाडले. यामुळे त्यांच्या मोबाईलवर आलेले सर्व मेसेजेस अनोळखी व्यक्तीच्या मोबाईलवर गेले. त्या व्यक्तीने या मेसेजेसच्या माध्यमातून विविध ओटीपी मिळवून, तसेच एसबीआय बँक खात्याचे इंटरनेट बँकिंगचे अॅक्सेस घेत सहा व्यवहारांद्वारे 18 लाख 3 हजार 244 रुपये डेबिट करून घेतले, तसेच एका महिलेचीही त्याचप्रकारे फसवणूक करीत तिच्या खात्यातून 8 लाख 2 हजार 31 रुपये डेबिट केले. अशा प्रकारे या अज्ञात आरोपीने दि. 20 ते 22 डिसेंबरच्या दरम्यान दोघांची मिळून 26 लाख 5 हजार 275 रुपयांची आर्थिक फसवणूक केली.
या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे करीत आहेत.