राज्यातील २५० पेक्षा अधिक नगरपालिका आणि नगर पंचायतींसाठी आज मतदान होत आहे. न्यायप्रविष्ट प्रकरणांमुळे २४ नगरपालिका आणि १५४ सदस्यांच्या निवडीसाठी आता २० डिसेंबरला मतदान होईल. तर मतमोजणी २१ डिसेंबरला होणार आहे. दरम्यान आज राज्यात ठिकठिकाणच्या मतदान केंद्रावर राडा, गोंधळ झाल्याचं पहायला मिळलं. नाशिक देखील यात मागे नाही.
नाशिकच्या त्र्यंबकेश्वर आणि भगूर येथे काही कारणांवरून गोंधळ झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्र्यंबकला नुतन त्र्यंबक विद्यालय येथील मतदान केंद्रावर प्रवेश करताना गेटजवळ उमेदवारांच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. त्यावेळी मतदारांना आमच्याकडे लक्ष राहू द्या असे सांगितले जात होते. यावेळी पोलिसांनी या उमेदवारांच्या समर्थकांना हटकले असता त्यांच्यात बाचाबाची झाली. या घटनेनंतर सध्या याठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
नाशिक जिल्ह्यातील ११ नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठी आज (दि.२) रोजी मतदान पार पडत आहे. मतदान झाल्यानंतर २६६ नगरसेवकांच्या आणि ११ नगराध्यक्षपदांसाठीच्या उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये आज बंद होईल. त्यानंतर २१ डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.