नाशिक : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सात जणांना 50 लाखांचा गंडा
नाशिक : सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून सात जणांना 50 लाखांचा गंडा
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - सरकारी नोकरी लावण्याचे आमिष दाखवून दोघांनी सात जणांना 50 लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
फसवणुकीचा पहिला प्रकार देवळाली कॅम्पमधील मुल्ला कॉम्प्लेक्समध्ये घडला. फिर्यादी सोनवणे व त्यांची बहीण संगीता व मामा चेतन वानखेडे यांना रेल्वेमध्ये ग्रुप ‘सी’ आणि ‘डी’ मध्ये सरकारी नोकरी लावण्याचे आमिष संतोष चंद्रकांत कटारे (वय 50, रा. देवळाली कॅम्प), संतोष शिवराम गायकवाड (वय 45) व अमोल ठाकूर (वय 43) यांनी दाखविले. 


त्यांनी भारत सरकारची राजमुद्रा असलेले छापील मोहर व रेल्वेचे सिम्बॉल असलेला छापील मोहर, त्यावर मिनिस्ट्री ऑफ रेल्वे, न्यू दिल्ली-110001 असा रबरी शिक्का व असिस्टंट पर्सनल ऑफिसरचा रबरी शिक्का व सही असे बनावट ऑफर लेटर तयार केले. त्यांनी तिघांकडून या बदल्यात 19 लाख 50 हजार रुपये घेतले. पैसे घेऊनही नोकरी न लागल्याने, तसेच ही ऑफर खोटे असल्याचे समजताच त्यांनी आरोपींविरुद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.

फसवणुकीची दुसरी घटना आरोपी संतोष कटारेच्या ऑफिसमध्ये घडली. आरोपी संतोष कटारे व संतोष गायकवाड यांनी फिर्यादी श्रीकांत पाटील व त्यांचा लहान भाऊ मयूर पाटील याला रेल्वे विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवीत प्रत्येक 8 लाख 25 हजार रुपये घेऊन एकूण 16 लाख 50 हजार रुपयांची फसवणूक केली. 

संतोष कटारे, संतोष गायकवाडकडून भारतीय रेल नावाचा वॉटर मार्क असलेल्या नियुक्तिपत्रावर सोनेरी रंगाची राजमुद्रा व त्याखाली सेंट्रल रेल्वे, तसेच मिनिस्ट्री ऑफ रेल्वे न्यू दिल्ली असे छापलेले बनावट नियुक्तिपत्र दिले. ऑगस्ट 2022 पासून दि. 15 ऑक्टोबर 2025 या तीन वर्षांच्या काळात रेल्वेमध्ये फिर्यादी यांना नोकरी लागली नाही, तसेच हे नियुक्तिपत्र बनावट असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी दोघा आरोपींच्या विरुद्ध देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक देशमुख करीत आहेत.

फसवणुकीच्या तिसर्‍या घटनेत संतोष कटारे व संतोष गायकवाड या जोडीने मयूर कांबळे व जयेश कांबळे यांना रेल्वेत नोकरी लावून दिल्याचे खोटे आदेश देऊन 14 लाखांची फसवणूक केली आहे.

ऑगस्ट 2022 ते दि. 15 ऑक्टोबर 2025 या काळात आरोपी कटारे व गायकवाड यांनी कांबळे बंधूंना मंत्रालय व विविध विभागांतील अधिकार्‍यांसोबतचे फोटो दाखवून आपली ओळख असल्याचे सांगितले. या दोघांना रेल्वेत नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दि. 25 ऑगस्ट 2022 रोजी दोन्ही भावांचे प्रत्येकी सात लाख याप्रमाणे 14 लाख रुपये स्वीकारले. 

सेंट जॉर्ज हॉस्पिटल येथे बनावट मेडिकल करून सीएसटी रेल्वे स्टेशन येथील एका ऑफिसमध्ये जाऊन भारतीय रेल्वे असे वॉटरमार्क असलेल्या लेटरहेडवर रेल्वे मंत्रालयाचे मोहर असलेले जॉयनिंग लेटर दिले. त्यानंतर बनावट नियुक्तिपत्र दाखवून कांजूर मार्ग रेल्वे स्टेशन येथे अनाऊन्सिंग डिपार्टमेंटमध्ये विनोद मंडल याचे नाव सांगून हजर करून घेऊन रेल्वेचे खोटे प्रशिक्षण घेतले. हा सर्व बनाव करून त्याने 14 लाख रुपयांची फसवणूक केल्याची फिर्याद मयूर कांबळे यांनी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात नोंदविली.
nashik |
इतर बातम्या
Join Whatsapp Group