नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) - बेकायदेशीर प्रशिक्षण अकादमीच्या माध्यमातून रुग्णांकडून अनधिकृत शुल्क आकारून, तसेच गंभीर शारीरिक इजा व विद्रूपता पोहोचवून फसवणूक करणार्या डॉक्टर दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी जयदीप सलिल घोषाल (वय 58) व डॉ. सुजाता जयदीप घोषाल-पिंगे (वय 55) यांची कॉलेज रोड येथे मालपाणी हॉस्पिटलजवळ विसे मळा येथे स्किनरेला द एस्थेटिक स्किन अॅण्ड हेअर क्लिनिक नावाची अकादमी आहे. डॉ. घोषाल दाम्पत्याने संगनमत करून बेकायदेशीररीत्या आर्थिक नफ्यासाठी त्वचारोगतज्ज्ञ असल्याचे नागरिकांना भासविले.
शैक्षणिक पात्रता व वैध परवाना नसतानाही कॉलेज रोड येथे स्किनरेला द एस्थेटिक स्किन अॅण्ड हेअर क्लिनिक या नावाचे बेकायदेशीररीत्या वैद्यकीय प्रॅक्टीस करून प्रशिक्षण अकादमी सुरू केली. या अकादमीच्या माध्यमातून जनतेला आकर्षित करून त्यांची फसवणूक केली, तसेच उपचारासाठी आलेल्या रुग्णांकडून अनधिकृतपणे शुल्क आकारले. एवढेच नव्हे, तर रुग्णांना गंभीर शारीरिक इजा, कायमस्वरूपी विद्रूपता पोहोचवून संबंधित डॉक्टर व्यावसायिक दाम्पत्याने कायद्याचे उल्लंघन केले, तसेच रुग्णांच्या सार्वजनिक आरोग्यास धोका निर्माण केला. हा प्रकार सन 2020 ते 2025 पावेतो सुरू होता.
याबाबत नाशिक मनपाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विजयकुमार देवकर (रा. कालिका पार्क, उंटवाडी) यांनी संशयित डॉ. जयदीप घोषाल व सुजाता घोषाल यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीची फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.