नाशिकरोड (भ्रमर प्रतिनिधी) :- ओळख निर्माण करून लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी लैंगिक अत्याचार करून तिला बाळाला जन्म देण्यास भाग पाडल्याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी मुलगी ही नाशिकरोड परिसरात राहते. आरोपी राहुल संतोष यादव (वय 25, रा. बालाजीनगर, नाशिकरोड) याने रिक्षा प्रवासादरम्यान फिर्यादीसोबत ओळख वाढविली. त्यानंतर “तुझ्यासोबत लग्न करतो,” असे आमिष तरुणीला दाखविले. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली.
आरोपी राहुल याने पीडितेला दि. 17 एप्रिल 2024 ते दि. 8 डिसेंबर 2025 या कालावधीत सायट्रिक ग्राऊंडच्या शेजारी, तसेच अयोध्यानगर, एकतानगर, ठाकरे मळा, जेलरोड अशा वेगवेगळ्या ठिकाणी भाडोत्री घेतलेल्या घरांमध्ये नेऊन तिच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संंबंध ठेवून तिला गरोदर केले व तिला बाळाला जन्म देण्यास भाग पाडले.
या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात राहुल यादवविरुद्ध पोक्सोअंतर्गत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काकडे करीत आहेत.