महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने कायदा-सुव्यवस्था, बंदोबस्त आणि संवेदनशील भागांचा आढावा घेण्यासाठी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे हे सध्या धुळे जिल्हा दौऱ्यावर आहेत. अशा वेळी पोलीस यंत्रणा अत्यंत सतर्क आणि शिस्तबद्ध असते. मात्र, याच कालावधीत पोलिसांकडूनच लाचखोरीचा प्रकार उघडकीस आल्याने पोलीस यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
सोमवारी रात्री लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) शिरपूर शहरात थाळनेर पोलीस ठाण्यातील एका हवालदारासह तीन पोलीस कॉन्स्टेबलना २ लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले.एसीबीने केलेल्या कारवाईमुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांसह संपूर्ण प्रशासनाच्या भुवया उंचावल्या आहेत.
माहितीनुसार, एका जुन्या गुन्ह्यात तक्रारदाराच्या वडिलांना अटक न करण्यासाठी थाळनेर पोलीस ठाण्यातील चार पोलिस कर्मचाऱ्यांनी ३ लाख रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीनंतर २ लाख रुपये देण्याचे ठरले. या प्रकरणाची तक्रार एसीबीकडे दाखल होताच शिरपूर शहरातील करवंद नाका परिसरात सापळा रचण्यात आला.
शिरपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील करवंद नाक्यावर कॉन्स्टेबल मुकेश गिलदार पावरा (वय ३३, रा. शिरपूर) याने तक्रारदाराकडून लाच स्वीकारण्याचे मान्य केल्यानंतर एसीबीच्या पथकाने कारवाई केली. पथकातील कर्मचारी साध्या वेशात परिसरात तैनात होते. लाच स्वीकारल्याचा इशारा मिळताच एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पावराला तात्काळ ताब्यात घेतले.
या कारवाईत खालील पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे.
भूषण रामोळे – पोलीस हवालदार
मुकेश गिलदार पावरा – पोलीस कॉन्स्टेबल
किरण सोनवणे – पोलीस कॉन्स्टेबल
धनराज मालचे – पोलीस कॉन्स्टेबल
मात्र, एसीबी पथकाचा सुगावा लागताच दोन संशयित आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. त्यांच्या शोधासाठी पोलिसांकडून पथके रवाना करण्यात आली आहेत.एसीबीने पुढील तपास वेगाने सुरू केला असून फरार आरोपींचा शोध आणि या प्रकरणातील इतर सहभागाची चौकशी करण्यात येत आहे.