नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : पाचशे रुपयांची लाच घेताना जिल्हा ग्राहक मंचच्या अभिलेखाकारास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. धीरज मनोहर पाटील (वय 43) व शिरस्तेदार सोमा गोविंद भोये (वय 57) अशी लाच घेणाऱ्या दोघांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी, की यातील तक्रारदार यांनी सावतानगरमध्ये राधा क्लासिक अपार्टमेंटमध्ये 27 लाख 50 हजार रुपये किंमतीचा फ्लॅट बुक केला होता. त्यासाठी त्यांनी 3 लाख 70 हजार रुपये एवढा ॲडव्हान्स दिला होता; परंतु बिल्डरने त्यांची फसवणूक करून त्यांच्या नावावर परस्पर इंडिया बुल फायनान्सकडून कर्ज मंजूर करून ते पैसे स्वतः परस्पर घेऊन त्यांना फ्लॅटचा ताबा दिला नाही.
यासाठी तक्रारदार यांनी नाशिक जिल्हा ग्राहक मंच येथे दावा दाखल केला होता. तक्रारदार यांची केस लवकर सुनावणीस घेण्यासाठी व त्यांना त्यांच्या कामासाठी पाहिजे असलेल्या फाईलची कागदपत्रे देण्यासाठी धीरज पाटील यांनी पाचशे रुपयांची लाच मागितली व सोमा भोये यांनी तक्रारदारास लाच देण्यासाठी प्रोत्साहन दिले.
हेी लाचेची रक्कम स्वीकारताना पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर अधीक्षक माधव रेड्डी, उपअधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक विश्वजित पांडुरंग जाधव, पो. हवा. प्रणय इंगळे, पो. हवा. सुनील पवार यांनी केली.