लग्नाचे आमिष दाखवत महिला पोलिसावरच अत्याचार, अविवाहित भासवले पण आरोपी निघाला दोन मुलांचा बाप
लग्नाचे आमिष दाखवत महिला पोलिसावरच अत्याचार, अविवाहित भासवले पण आरोपी निघाला दोन मुलांचा बाप
img
वैष्णवी सांगळे
लग्नाचे आमिष दाखवत , प्रेमाचे नाटक करत अनेक महिलांवर अत्याचार झालेले आहेत आणि हे प्रकार वाढतच आहे. धक्कादायक म्हणजे नागपूरमध्ये लग्नाचे अमिश दाखवत एका २५ वर्षीय महिला पोलीस अंमलदारावरच अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. 

नेमकं काय घडलं ?

३० वर्षीय विकिन सूर्यभान फुलारे हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील रहिवासी आहे. त्याने एका नामांकित विवाह नोंदणी संकेतस्थळावर स्वतःला अविवाहित वकील म्हणून सादर केले. याच खोट्या ओळखीच्या आधारे त्याने महिला पोलिसाशी संपर्क साधला. सुरुवातीला चॅटिंग, त्यानंतर व्हिडीओ कॉल्स अशा माध्यमातून त्याने तिचा विश्वास संपादन केला. आपण लग्न करू इच्छित असल्याचे भासवून आरोपीने तिच्याशी भावनिक नाते निर्माण केले.

ओळख दृढ झाल्यानंतर आरोपी नागपूरला आला. २८ नोव्हेंबर रोजी त्याने महिलेला लग्नाची मागणी घालून एका लॉजवर नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करण्यात आला. या दरम्यान आरोपीने महिलेचे अश्लील फोटो आणि व्हिडीओ चोरट्या पद्धतीने काढल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानंतर हे फोटो-व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्याने महिलेला मानसिक दबावाखाली ठेवले.

या भीतीचा गैरफायदा घेत आरोपीने फर्निचर खरेदी, वैयक्तिक अडचणी आणि इतर कारणे सांगत वेळोवेळी महिलेकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळले. एकूण १५ लाख ६० हजार रुपये त्याने खंडणीच्या स्वरूपात घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. जेव्हा पीडितेने लग्नाचा आग्रह धरला, तेव्हा आरोपीने किन्नरांकडून जिवे मारण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी दिली. 

अखेर मानसिक त्रासाला कंटाळून महिला पोलिस कर्मचाऱ्याने लकडगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तपासात आरोपी आधीच विवाहित असून त्याला दोन मुले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. गंगापूर पोलिसांच्या मदतीने सापळा रचत २० डिसेंबर रोजी आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणाने ऑनलाईन ओळखीबाबत सतर्क राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group