नाशिकच्या मालेगावमधील ३ वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच राज्यात पुन्हा एकदा चिमुकलीवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे एका हैवान शिक्षकाने ७ वर्षाच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला आहे. ही संतापजनक घटना नांदेड शहरात घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सदर घटना ही नांदेड शहरात घडली असून २० नोव्हेंबर रोजी पीडित अल्पवयीन मुलगी शाळेत जाण्यास कुटुंबियांना नकार देत होती. रोज आवडीने शाळेत जाणारी मुलगी आज शाळेत जायला नकार देत असल्याने तिच्या आईने तिला याबाबत विचारणा केली. सतत विचारणा केल्याने अखेर चिमुकलीने शिक्षकाने तिच्यावर अतिप्रसंग केल्याचा प्रकार सांगितला.
घडलेला प्रकार ऐकून पीडित मुलीची आई संतापली. तिने तातडीने पोलीस स्टेशन गाठले. हैवान शिक्षकाविरोधात भाग्यनगर पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून आरोपी शिक्षक विशाल लोखंडे याच्यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपी शिक्षकास अटक करण्यात आली आहे. या घडलेल्या प्रकाणानंतर महाराष्ट्रात खरं कायद्याची भीती संपल्याचंच बोललं जात आहे.
हा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवण्याची विनंती न्यायालयाला करणार असल्याची प्रतिक्रिया उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर वैजंने यांनी दिली आहे. शिवाय या घटनेचा तपास सुरु असून विद्येचं मंदिर असलेल्या शाळेतसुद्धा मुली सुरक्षित नाहीत ही धक्कादायक बाब समोर आली आहे.