चंद्रपूर : येथील एका अल्पवयीन मुलीला खर्रा खाण्याचे व्यसन लागले. खर्रा खाण्यासाठी पैसे नसल्याने तिने पाटन टपरीवरून उधारीवर खर्रा खाण्यास सुरुवात केली. एक दिवस असा आला की तिच्याकडे पैसे नव्हते आणि पान टपरीवाला उधारीवर खर्रा देण्यास तयार नव्हता. खर्रा खाण्याचे व्यसन लागलेल्या या मुलीची अगतिकता पाहून पान टपरीचालकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा धक्कादायक प्रकार चंद्रपूर शहराजवळच असलेल्या दुर्गापूर येथे घडला आहे.
पीडित मुलगी ही 16 वर्षांची असून पोलिसांनी तिच्यावर अत्याचार करणाऱ्या पान टपरीवाल्याला अटक केली आहे. बबन रोहणकर (52 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवला असून त्याच्याविरोधात पोक्सो अंतर्गतही गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार खर्ऱ्याची उधारी वसूल करण्यासाठी चंद्रपूरमध्ये एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करण्यात आलं आहे. चंद्रपूर शहरातील दुर्गापूर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे. या लैंगिक शोषणातून पीडित मुली गर्भवती झाल्याने हा प्रकार उघडकीस आला.
नेमकं काय आहे प्रकरण ?
पीडित मुलगी आरोपी बबन रोहणकर याच्याकडून उधारीने खर्रा घ्यायची. तिची खर्ऱ्याची उधारी तीन हजार रुपयांवर पोहोचली होती. त्यानंतर ही उधारी फेडण्यासाठी रोहणकर पीडित मुलीकडे तगादा लावत होता. मात्र ही मुलगी उधारी फेडू शकली नाही. परिणामी आरोपी बबन रोहणकर या पीडित अल्पवयीन मुलीचे गेल्या 4 महिन्यांपासून शोषण करत होता. याच शारीरिक शोषणातून पीडित मुलगी गर्भवती झाली. त्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली.
हा घृणास्पद प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी तत्परतेने आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सध्या आरोपीला अटक केली आहे. आरोपीविरोधात कलम 376, पोक्सो, ॲट्रॉसिटी कायदा असे वेगवेगळे कलम आणि कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.