बुलढाणा जिल्ह्याच्या लोणी गवळी गावातील एका प्राथमिक शाळेत धक्कादायक घटना घडली आहे. एका सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आलेल्या शिक्षकाने तिसरीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनीवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. शाळांमध्ये मुलीवर अत्याचार होण्याच्या घटना वाढत असल्याने मुलीच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. घटना समजताच गावकऱ्यांनी संबंधित शिक्षकाला चांगलाच चोप दिला त्यानंतर या नराधमाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
मेहकर तालुक्यातील लोणी गवळी गावातील प्राथमिक शाळेत तिसरीत शिकणाऱ्या एका नऊ वर्षीय विद्यार्थिनीसोबत 58 वर्षीय शिक्षकाने लैंगिक अत्याचार केला. आज सकाळी साडेदहा वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. घटना गावातील नागरिकांना माहीत पडताच शेकडोंचा जमाव शाळेवर चालून गेला. गावातील नागरिक आणि महिलांनी या शिक्षकाला चांगलाच चोप दिला. तात्काळ या घटनेची माहिती डोनगाव पोलिसांना देण्यात आली व पोलिसांनी आरोपी शिक्षक महादेव आत्माराम मानतोडे याला ताब्यात घेतले. मात्र, गावकरी पोलिसांना या शिक्षकाला घेऊन जाण्यास मज्जाव करत होते व गेल्या तीन तासांपासून शाळेत तणावाचे वातावरण निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, शेवटी पोलिसांनी गावकऱ्यांची समजूत काढत या आरोपी शिक्षकाला डोनगाव पोलीस स्थानकात आणले आहे, सध्या गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे हा नराधम शिक्षक येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहे. सेवानिवृत्तीला अवघा दीड महिना बाकी असताना आणि वयोवृद्ध असतानाही नराधम शिक्षकाने शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या नात्याला काळिमा फासण्याचं काम केलंय.