धक्कादायक! बुलढाण्यात केस गळतीच्या संकटानंतर आता रुग्णांच्या नखाचीच गळती, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
धक्कादायक! बुलढाण्यात केस गळतीच्या संकटानंतर आता रुग्णांच्या नखाचीच गळती, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
img
Dipali Ghadwaje
 बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यातील केस गळती प्रकरणाला गंभीर वळण लागलं आहे. केस गळती झालेल्या रुग्णांची आता नखं गळती सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे.

केस गळती झालेल्या रुग्णांची नखं कमजोर होऊन विद्रूप झालेली नखं गळून पडत आहे.  या नखं गळती प्रकरणाने परिसरात भीतीचं वातावरण दिसून येत आहे. 

गेल्या डिसेंबर महिन्यापासून बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव, नांदुरा, खामगाव तालुक्यातील अनेक गावात अचानक केस गळतीने नागरिक हैराण झाले होते. आता केस गळती झालेल्या रुग्णांची नखे अचानक विद्रूप होऊन नखे कमजोर होऊ लागली आहेत तर अनेकांची नखे गळून पडली असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आल आहे. 

नक्की कुठला आजार? नागरिक साशंक

या परिस्थितीमुळे आता या परिसरातील नागरिक दहशतीत आहेत. गेल्या डिसेंबर महिन्यापासून नागरिकांची फक्त तपासणी झाली. ICMR चे पथक आले. अनेक वेळी रक्ताचे नमुने घेतल्या गेलेत. मात्र, औषध उपचाराच्या नावावर रुग्णांना काहीच दिले नसल्याचा आरोप करत आरोग्य व जिल्हा प्रशासनाने रुग्णांना वाऱ्यावर सोडल्याचा आरोप नागरिक करत आहेत. अद्यापही ICMR चा अहवाल जाहीर करण्यात आलेला नसल्याने सरकार नेमक काय लपवू पाहत आहे? यावर नागरिकांना शंका येत आहे. या परिसरात अतिशय धक्कादायक चित्र असून नक्की हा कुठला आजार आहे? या बद्दल नागरिक साशंक आहेत. 

काय म्हणाले आरोग्य अधिकारी? 

दरम्यान, याबाबत बुलढाणा आरोग्य अधिकारी (वर्ग एक) डॉ. अनिल बनकर यांनी म्हटलं आहे की, एकूण चार गावांमध्ये नखांची समस्या असलेले रुग्ण आढळून आले आहेत. काही रुग्णांमध्ये नखांची गळती होत आहे. चार गावांमध्ये सध्या एकूण 29 रुग्ण आढळून आले आहेत. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहे.

पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय शेगाव येथे सांगण्यात आले आहे. सेलेनियमचे वाढत्या प्रमाणामुळे ही समस्या होत असल्याचा अंदाज आहे. जे केस गळतीचे रुग्ण आहेत, त्यांच्यामध्ये सध्या नखं गळतीची समस्या जाणवत आहे, असे त्यांनी यावेळी सांगितले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group