रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 10 मजुरांना ट्रकने पहाटे चिरडले, चौघांचा मृत्यू, 6 जखमी
रस्त्याच्या कडेला झोपलेल्या 10 मजुरांना ट्रकने पहाटे चिरडले, चौघांचा मृत्यू, 6 जखमी
img
दैनिक भ्रमर

बुलढाणा (भ्रमर वृत्तसेवा) :-  बुलढाण्यातील राष्ट्रीय महामार्गावर खामगाव - मलकापूर दरम्यान वडनेर गावाजवळ महामार्गाच्या बाजूला झोपलेल्या 10 मजुरांना भरधाव आयशर टेम्पोने चिरडले आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी आहेत. 

ट्रकने चिरडलेले सर्व मजूर रस्त्याच्या कडेला झोपलेले होते. जखमी मजुरांवर मलकापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रक चालकाचे  वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा भीषण अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. संपूर्ण रस्त्यावर रक्ताचा सडा पडलेला आहे. 

हे सर्व मजूर मध्यप्रदेशातील असून महामार्गाच्या कामासाठी आलेले होते. पहाटे साडे पाच वाजता हा अपघात घडला.  या अपघातात प्रकाश धांडेकर, पंकज जांभेकर, अभिषेक जांभेकर अशा या तीन मृतांची नावे असून एकाची ओळख अद्याप पटलेली नाही.  

भल्या पहाटे घडलेल्या या अपघाताचा पोलीस अधिक तपास करत आहेत. मृतांची इतर माहिती घेण्याचे काम सुरू आहे. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली.  या परिसरात पोलिसांनी आता मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.  या अपघातात सहा मजूर हे जखमी झाले असून यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. या सर्वांवर मलकापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. हे सर्व मजूर गेल्या आठवड्यातच महामार्गाच्या कामासाठी आले होते.


इतर बातम्या
Join Whatsapp Group