पुणे : राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे यांच्या कारचा अपघात झाला आहे.
पुणे-सोलापूर महामार्गावर सोरतापवाडी येथे पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. कार आणि ट्रॅव्हल बस यांच्यात भीषण धडक होऊन या अपघातात राजश्री मुंडे किरकोळ जखमी झाल्या आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
महामार्गावरून जाताना राजश्री मुंडे यांची कार आणि ट्रॅव्हल बसची आमने-सामने धडक झाली. पहाटेच्या सुमारास झालेल्या या अपघातामुळे महामार्गावर वाहतूक काही काळासाठी खोळंबली होती. या अपघाताबाबत प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही वाहनांची वेगाने धडक झाल्यामुळे हा भीषण अपघात झाला. घटनेची माहिती मिळताच तातडीने स्थानिक पोलिस आणि आपत्कालीन सेवांनी पोहोचून मदतकार्य सुरू केलं.
घटनेनंतर त्यांना उपचारासाठी मुंडेंना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर पोलिसांनी घटनेची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.