मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणी काही केल्या कमी होत नसल्याचे दसतेय. आधीच खंडणी आणि खून प्रकरणात निकटवर्तीय वाल्मिक कराड अडकल्याने विरोधक धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागत असताना, अशातच आता धनंजय मुंडे यांच्या मामीनेच आता मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
बुधवारी धनंजय मुंडे यांच्या मामी सारंगी प्रवीण महाजन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली. खंडणी आणि खून प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्याच पण मलाही न्याय मिळवून द्या, असे आर्जव सारंगी महाजन यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केले. यानंतर त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या की , “मुख्यमंत्र्यांनी मला खात्री दिली आहे. मी तुम्हाला न्याय देईन म्हणून. माझ्या भाच्याने धनंजय मुंडे यांच्या नोकराने जागा हडप केली आहे. खरंतर धनंजयला एवढं करायची गरज नव्हती. समोर येऊन मला बोलला असता की, मामी तुझी जागा आहे. आम्हाला हवी आहे तर आपण कमी-जास्त व्यवहार करुन ती जमीन देऊ शकलो असतो. पण त्यांनी माझी फसवणूक केली. त्याने मला तिथे परळीला बोलावलं. त्याच्या नोकराला व्यवहारात मध्ये ठेवलं. गोविंद बालाची मुंडे हा त्याचा नोकर होता. त्याला मध्ये ठेवलं. त्या नोकराच्या माध्यमातून दीड एकर पेक्षा जास्त जमीन हडप केलेली आहे. त्यातील 27 गुंठे जमीन शासनात गेली आहे”, असा दावा सारंगी महाजन यांनी केला.
“शासनाचा रेडी रेकनर रेट कमी दाखवून मला कमी पैसे मला मिळवून दिले आहेत. मला माझी जागाही माहिती नव्हती की, कुठे आहे, तसेच ही जागा कुणाला विकत आहोत हेही माहिती नव्हतं. फक्त गोड बोलून मला परळीत बोलावलं. परळीत गेल्यानंतर त्यांनी मला ओलीस ठेवलं. परळीत अनुसया हॉटेलमध्ये ठेवलं. तिथे त्यांचे चार-पाच लोकं होते, त्यांनी तिथून मला रजिस्टर ऑफिसमध्ये नेलं. तिथे रजिस्टारने आम्हाला काहीही विचारलं नाही. तिथे थेट आमची स्वाक्षरी घेतली, फोटो काढला आणि आम्हाला बाहेर काढलं”, असा आरोप सारंगी महाजन यांनी केला.