पुणे मनपात महिला अधिकाऱ्यांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याप्रकरणी आता महिला आयोग ॲक्शन मोडमध्ये आला आहे. वैष्णवी हगवणे प्रकरणात महिला आयोग आणि अध्यक्षा चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर विविध आक्षेप नोंदवले गेले. हगवणे प्रकरणात आरोपीच राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्याने महिला आयोगाने जाणून बुजून विलंब केल्याचा ठपका विरोधकांनी महिला आयोगावर ठेवला.त्यावरून विरोधकांनी चाकणकर यांना जोरदार लक्ष्य केले. याच पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेतील महिला अधिकारी शिवीगाळ प्रकरणी महिला आयोगाने लगोलग कार्यवाही केली आहे.
शिवीगाळ केल्याप्रकरणी भाजप कामगार आघाडीचा अध्यक्ष ओंकार कदमच्या प्रकरणावर महिला आयोगाकडून चौकशी सुरू झाली आहे. तीन ते चार दिवसात अहवाल सादर होणार असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी एक्सवर पोस्ट करून माहिती दिली आहे.
पुणे महानगरपालिकेतील महिला कर्मचाऱ्यांना राजकीय पक्षाचे कार्यकर्ते हेतुपुरस्सर, जाणिवपूर्वक त्रास देत कामात बाधा आणत असल्याची तक्रार राज्य महिला आयोगाकडे दि. ०५.०६.२०२५ रोजी आली होती. आयोगाने दि. ०६.०६.२०२५ रोजी आयुक्त, पुणे महानगरपालिका यांना तातडीने चौकशी करत कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. आयोगाच्या निर्देशानुसार त्याच दिवशी दि. ०६.०६.२०२५ ला आयुक्तांनी तातडीने राजकीय पक्षाच्या सदर कार्यकर्त्यांना महानगरपालिकेच्या मुख्यालयात आणि इतर कार्यालयात प्रवेश बंदी केली आहे.
तसेच पुणे महापालिकेच्या अंतर्गत समितीकडे काल दि. १०.०६.२०२५ रोजी याप्रकरणी सुनावणी झाली आहे. कागदपत्रांची तपासणी, काही विभागांकडून अहवाल प्राप्त करून घेत पुढील आठवड्यात पुन्हा अंतर्गत समितीकडे सुनावणी होणार आहे. या समिती पुढे सुरू असलेल्या सुनावणीचा आणि त्यावर करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा अहवाल आयोगास सादर होईल.
काल १० जून २०२५ रोजी याप्रकरणी सुनावणी झाली आहे. कागदपत्रांची तपासणी, काही विभागांकडून अहवाल प्राप्त करून घेत पुढील आठवड्यात पुन्हा अंतर्गत समितीकडे सुनावणी होणार आहे. या समिती पुढे सुरू असलेल्या सुनावणीचा आणि त्यानंतर करण्यात येणाऱ्या कार्यवाहीचा अहवाल आयोगास सादर होईल, असे रुपाली चाकणकर यांनी सांगितले.