राजकीय ! शिंदे गटाच्या ''या''  बड्या नेत्याने राज ठाकरेंना दिली ''ही'' ऑफर
राजकीय ! शिंदे गटाच्या ''या'' बड्या नेत्याने राज ठाकरेंना दिली ''ही'' ऑफर
img
नंदिनी मोरे
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर  मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतील एका हॉटेलात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळातील घडामोडींना वेग आला आहे. या भेटीमुळे  मनसे महायुतीत जाण्याची चर्चा रंगली आहे. मात्र, यावर भाजप आणि मनसेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

दरम्यान, या चर्चा सुरू असतानाच शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी थेट राज ठाकरेंना शिंदे गटासोबत युती करण्याची ऑफर दिली आहे. त्यामुळे राज ठाकरे हे भाजपसोबत जाणार, शिंदे गटासोबत जाणार की उद्धव ठाकरे गटासोबत जाणार? याची चर्चा रंगली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी थेट राज ठाकरे यांना युतीची ऑफर देऊन चर्चेचा धुरळा उडवला आहे. राज ठाकरे यांना यापूर्वीही आम्ही ऑफर दिली होती. आजही आमची राज ठाकरे यांना आमची सोबत येण्यासाठी ऑफर आहे. राज ठाकरे हे चांगल्या पद्धतीने महानगरपालिकेची निवडणूक लढू शकतात. त्यांनी आमच्या सोबत यायला पाहिजे, असं संजय शिरसाट यानी म्हटलं आहे.

कोण काय बोलतो. यापेक्षा युती कुणाशी होते, कुणासोबत होते हे पाहणं महत्त्वाचं आहे. उबाठा गटाची भूमिका काय आहे हे कळत नाही, शरद पवार त्यांच्यासोबत नाही, काँग्रेस त्यांना विचारत नाही, असा टोला शिरसाट यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.

राज ठाकरे हे दरवेळी जेव्हा भेटतात तेव्हा त्यांची कामं असतात. काही सूचना असतात. पुढची राजकीय परिस्थिती काय असेल त्यावर आता भाष्य करणे योग्य होणार नाही. या भेटीवर राज ठाकरे किंवा मुख्यमंत्री हे खुलासा करतील, अशी सावध प्रतिक्रियाही त्यांनी दिली. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? यावरही शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली. राजकारणात यूटर्न अनेक वेळा पाहायला मिळतात. पण जोपर्यंत युती होत नाही, तोपर्यंत बोलता येत नाही. जे काही होईल ते काही दिवसात समजेलच. मात्र राजकारणात काही होऊ शकतं, असं सूचक विधान त्यांनी केलं.
इतर बातम्या
Join Whatsapp Group