निकाल आधीच गुलाल! बारामती पोटनिवडणुकीच्या निकालापूर्वीच सुनेत्रा पवारांच्या विजयाचे फ्लेक्स
निकाल आधीच गुलाल! बारामती पोटनिवडणुकीच्या निकालापूर्वीच सुनेत्रा पवारांच्या विजयाचे फ्लेक्स
img
Jayshri Rajesh



पिंपरी चिंचवड: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा अधिकृत निकाल हाती येण्यास अजून काही दिवस बाकी असतानाच, महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड मोठी खळबळ उडाली आहे. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी नुकतेच २३ एप्रिल रोजी मतदान शांततेत पार पडले. या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवार आणि राज्याच्या विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार स्वतः रिंगणात उतरल्या आहेत. मात्र, अधिकृत मतमोजणी होण्यापूर्वीच पिंपरी-चिंचवड शहरात सुनेत्रा पवारांच्या विजयाचे भव्य फ्लेक्स झळकले असून, ते सध्या संपूर्ण राज्यात जोरदार चर्चेचा विषय बनले आहेत. 

निकालाआधीच थेट 'आमदार' म्हणून उल्लेख

पिंपरी चिंचवडमधील अतिउत्साही कार्यकर्त्यांनी लावलेल्या या बॅनरवर थेट "सुनेत्राताई अजितदादा पवार यांची आमदारपदी प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन" असा मोठा मजकूर लिहिला आहे. बारामती हा नेहमीच पवार कुटुंबाचा पारंपरिक बालेकिल्ला राहिला आहे. 

त्यातच काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने माघार घेतल्यामुळे ही निवडणूक सुनेत्रा पवारांसाठी अत्यंत सोपी मानली जात होती. सुनेत्रा वहिनींचा विजय निश्चित असल्याचे गृहीत धरूनच त्यांच्या समर्थकांनी मतमोजणीची औपचारिकता संपण्याआधीच थेट शुभेच्छांचे बॅनर लावायला सुरुवात केली आहे. 

४ मे रोजी होणार अधिकृत फैसला

बारामतीच्या या अत्यंत प्रतिष्ठेच्या आणि हायव्होल्टेज पोटनिवडणुकीसाठी २३ एप्रिल रोजी अत्यंत शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून त्यात अंदाजे ५८.२७ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. या निवडणुकीचा अंतिम आणि अधिकृत निकाल ४ मे २०२६ रोजी जाहीर केला जाणार आहे. 

भावनिक पार्श्वभूमी आणि राजकीय गणित

अजित पवार यांच्या जाण्याने बारामतीत एक मोठी पोकळी निर्माण झाली होती. याच पार्श्वभूमीवर सहानुभूतीच्या लाटेत सुनेत्रा पवार यांनी अजितदादांची अपूर्ण स्वप्ने पूर्ण करण्याची भावनिक हाक देत ही निवडणूक लढवली आहे. विरोधी पक्षांकडून कोणताही मोठा तगडा उमेदवार मैदानात नसल्याने त्यांचा विजय अगदी सोपा मानला जात आहे. मात्र, निकाल हाती येण्यापूर्वीच लागलेल्या या विजयाच्या फ्लेक्सबाजीवर आता राजकीय वर्तुळातून आणि विरोधकांकडून काय प्रतिक्रिया उमटतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 


इतर बातम्या
Join Whatsapp Group