पावसाळी अधिवेशन चालू असताना कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा सभागृहात ऑनलाईन रमी खेळतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावरुन सुरु झालेला वादा अजूनही संपलेला नाही. माणिकराव कोकाटे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीसाठी आले आहेत.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार आणि माणिकराव कोकाटे यांच्यातील बैठक नुकतीच पार पडली. या भेटीत कोकाटे यांनी अजित पवारांकडे दिलगिरी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या बैठकीत माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवरून किंवा घडलेल्या काही वादग्रस्त घटनांवरून अजित पवारांकडे आपली माफी मागितली. तसेच, भविष्यात अशा गोष्टी पुन्हा घडणार नाहीत, असे ठोस आश्वासन दिले आहे.
त्यामुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे, कारण यापूर्वी अशी चर्चा होती की, माणिकराव कोकाटे यांना मंत्रीपदावरून हटवलं जाण्याची जाण्याची शक्यता कमी असली तरी, त्यांच्याकडील कृषी खाते काढून घेतले जाऊ शकते.
मात्र या बैठकीनंतर लगेचच अजित पवारांच्या दालनात 'प्री-कॅबिनेट' बैठकीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे, कोकाटे यांच्या भवितव्याबाबतचा सर्वस्वी निर्णय आता अजित पवार जाहीर करतील, असे स्पष्ट झाले आहे.
अजित पवार हे त्यांच्या कठोर भूमिकेसाठी ओळखले जातात. त्यामुळे, कोकाटे यांच्यावरील आरोपांबाबत आणि त्यांच्या माफीनंतर अजित पवार काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.