महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न राजकीय नेत्यांना पडलेला आहे. गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात पक्षांतरे होत आहे. त्यात आता पुन्हा काँग्रेसचा बडा नेता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या गळाला लागला आहे.
रायगड जिल्ह्यातील माजी आमदार मधुकर ठाकूर उर्फ मधूशेठ यांचे ज्येष्ठ पुत्र काँग्रेस आय चे प्रदेश सर चिटणीस प्रवीण मधुकर ठाकूर हे पंजा सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ काही दिवसात हाताच्या मनगटावर बांधण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी स्वतः सांगितले आहे.
"काँग्रेसमध्ये आता कुठलाही ताळमेळ उरलेला नाही. कार्यकर्त्यांचा आवाज दाबला जातोय. त्याउलट राष्ट्रवादी काँग्रेसकडे कोकण आणि रायगडसाठी ठोस दिशा आणि धोरण आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे काँग्रेस पक्षात मनमानी कारभार करीत असलेल्या कार्य प्रणाली याला त्रासून काँग्रेस पक्षाचा झेंडा खाली ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ घेण्याचा निर्णय झाला आहे. असे प्रवीण ठाकूर यांनी म्हटले आहे.
येत्या ०२ ऑगस्ट २०२५ रोजी अलिबागमध्ये होणाऱ्या विशेष कार्यक्रमात ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अधिकृतपणे प्रवेश करणार आहेत.या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे उपस्थित राहणार आहेत.