राज्याच्या विधानसभा निवडणुकीनंतर महाविकास आघाडीला गळती लागली आहे. शरद पवार गटातील अनेक दिग्गज नेते आणि माजी आमदारांनी पक्षांतर केलं आहे. आता आणखी एक धक्का बसणार आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तोंडावरील ही राजकीय घडामोड शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरणारी आहे. परभणीतील माजी आमदार विजय भांबळे शरद पवारांची साथ सोडून अजित पवार गटातप्रवेश करणार आहेत.
मुंबईतील नरिमन पॉइंट येथील महिला विकास मंडळ सभागृहात आज अजित पवार यांच्या उपस्थितीत भांबळे हाती घड्याळ बांधणार आहेत.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही घडामोड महत्वाची मानली जात आहे. ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. त्यावेळी भांबळे यांनी शरद पवार यांच्यासोबतच राहण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, आता मात्र त्यांनी अजित पवार गटात प्रवेश निश्चित केला आहे.
माजी आमदार विजय भांबळे 2014 ते 2019 या काळात जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते. जिंतूर आणि सेलू या दोन तालुक्यात भांबळे यांची राजकीय वजन आहे.
2019 मधील निवडणुकीतही त्यांनी नशीब आजमावलं होतं. परंतु, विद्यमान पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली. अजित पवारांनी आमदारांचा एक मोठा गट घेऊन महायुतीत सहभाग घेतला.
या काळात त्यांनी शरद पवार गटात थांबणेच पसंत केले होते. नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी शरद पवार गटाकडून उमेदवारी केली होती. मात्र याही निवडणुकीत मेघना बोर्डीकर यांनी त्यांचा पराभव केला.
यानंतर राजकीय घडामोडी वेगाने घडल्या. महाविकास आघाडीला गळती लागली. शरद पवार गटातून अनेकांनी अजित पवार गटात प्रवेश केला. विजय भांबळे देखील अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. या चर्चा अखेर खऱ्या ठरल्या आहेत.