राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम सुरु आहे. महापालिका निवडणुकीसाठी अवघे काही तास उरले आहेत. उद्या महापालिकेसाठी मतदान पार पडणार आहे. तर १६ जानेवारीला अनेकांचे राजकीय भवितव्य समोर येणार आहे. दरम्यान पक्षांना बड्या नेत्यांकडून धक्का देणे सुरूच आहे आता राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
शरद पवार यांचे 42 वर्षांपासून असलेले खंदे समर्थक आणि माजी आमदार रमेश कदम यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ सोडली आहे. त्यांनी पक्षाच्या सदस्यस्त्वाचा राजीनामा दिला आहे. ऐन निवडणुकीत हा राजीनामा आल्याने पक्षाला मोठा धक्का बसला आहे. रमेश कदम यांचा चिपळूण नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यानंतर त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.
माहितीनुसार, रमेश कदम हे नाराज होते. पक्षात योग्य स्थान आणि सहकार्य न मिळाल्यामुळे त्यांनी शदर पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत जाधव यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला आहे. रमेश कदम हे 1984 पासून हे शरद पवारांसोबत होते. अजित पवार यांनी बंड केल्यानंतर अनेक बडे नेत्यांनी साथ सोडत घडयाळ हाती घेतले मात्र रमेश कदम हे शरद पवारांसोबत होते.
रमेश कदम म्हणाले, पक्षासाठी जे काही आवश्यक होते ते सर्व केले. मात्र आता पक्षात कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना किंमत उरलेली नाही तसेच १५ दिवस आराम करणार असून अजूनतरी कुठल्या पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.