महाराष्ट्रातील २९ महापालिका निवडणुकींसाठी मतदान होण्यास अवघे १२ दिवस शिल्लक आहेत आणि निकाल जाहीर व्हायला १३ दिवस बाकी आहेत. मात्र, या पूर्वीच अनेकांनी विजयाचा गुलाल उधळला आहे. राज्यभरात आतापर्यंत एकूण ६७ उमेदवारांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली आहे.
यामध्ये भाजपा ४५, शिवसेना शिंदे गट १९ , राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट २ आणि इतर १ असे एकूण ६७ उमेदवार बिनविरोध नगरसेवक झाले आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात बिनविरोध नगरसेवकांची संख्या बघता विरोधकांनी संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे आता मुंबईसह राज्यातील बिनविरोध निवडणुकांची चौकशी करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत.
विरोधी उमेदवारांवर दबाव, आमिष किंवा जबरदस्ती करून नामनिर्देशन मागे घेण्यास भाग पाडले गेले का ? याची तपासणी करण्यात येणार आहे.
चौकशी पूर्ण होईपर्यंत बिनविरोध निवडींची विजय घोषणा केली जाणार नाही, अशी माहितीही राज्य निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे विजयी नगरसेवक आता राज्य निवडणूक आयोगाच्या रडारवर असणार आहे.