उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दुर्दैवी निधनानंतर संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. अजित दादांच्या आकस्मिक निधनामुळे राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. राज्य सरकारने 28 ते 30 जानेवारी दरम्यान तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर केला आहे. मात्र या दुखवट्यामुळे आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लांबणीवर पडणार का? असा प्रश्न जनतेच्या मनात उपस्थित झाला आहे. याच संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
राज्यातील १२ जिल्हा परिषदांच्या निवडणुका ठरलेल्या वेळापत्रकानुसार ५ फेब्रुवारीला होणार की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे त्या पुढे ढकलल्या जाणार, याबाबतचा अंतिम निर्णय राज्य निवडणूक आयोग आज (गुरुवारी) घेणार आहे. २८ जानेवारी ते ३ फेब्रुवारीपर्यंत प्रचार करता येणार आहे.राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या नेत्यांच्या मोठ्या सभा ३० जानेवारीपर्यंत होणार नाहीत. तरीही प्रचारासाठी चार दिवस मिळणार आहेत. त्यामुळे निवडणुका पुढे ढकलायच्या की आहे त्या वेळापत्रकानुसार घ्यायचा यावरती आज शिक्कामोर्तब होईल.
आयोगाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, निवडणुकीशी संबंधित सर्व बाबींचा सखोल विचार करूनच निर्णय घेतला जाईल. राज्यात तीन दिवसांचा शासकीय दुखवटा जाहीर करण्यात आल्याने ३० जानेवारीपर्यंत मोठ्या नेत्यांच्या सभा होणार नाहीत. असे असले तरी उर्वरित काळात किमान चार दिवसांचा प्रभावी प्रचार करण्याची संधी उमेदवारांना मिळणार आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला निवडणूक कार्यक्रमात कोणताही बदल होण्याची शक्यता कमी असल्याचे संकेत मिळत आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणूक नियोजित कार्यक्रमानुसार ५ फेब्रुवारी रोजीच घ्यावी, असा विचार आयोग करत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असताना मोठ्या नेत्याचे निधन झाल्याचा प्रसंग या आधी उद्भवलेला नव्हता. असे पहिल्यांदाच घडत असल्याने सर्व बाबींचा विचार करून गुरुवारी निर्णय घेऊ, असे आयोगाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.