राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आज सोमवारी सुरुवात झाली. अधिवेशनाच्या प्रथेप्रमाणे पहिल्या दिवशी विधिमंडळाच्या सदस्य असलेल्या दिवंगत नेत्यांना आदरांजली वाहण्यासाठी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादांच्या आठवणींना उजाळा देताना भावुक झाल्याचे दिसले.
देवेंद्र फडणवीस काय म्हणाले ?
आज बोलणं कुठून सुरु करावं असा प्रश्न मला पडला आहे. एक प्रचंड वादळ मनात आहे. कारण आज सभागृहात शोक प्रस्तावासाठी आपण एकत्र आहोत. कधीच कल्पना केली नव्हती अशाप्रकारच्या शोकप्रस्तावावर व्यक्त व्हावं लागेल. अधिवेशनात कधीही सहज बाजूला नजर गेली की, बाजूला खुर्चीत दादा असायचे. सकाळपासून रात्री कितीही उशीरापर्यंत सभागृह चाललं तरी अजितदादा आपल्या जागेवर बसलेले दिसायचे. आज दुर्दैवाने ते आपल्यात नाहीत ही खंत आहे.
महाकवी भास यांच्या 'स्वप्नवासवदत्तम्' या नाटकात एक सुभाषित आहे. लाकूड जळते तेव्हा अग्नी फक्त शरीर जाळतो. पण मित्रशोक हा हृदय आणि अंतस्थ आत्म्यालाही जाळतो, असे त्यामध्ये म्हटले आहे. अजित पवार यांच्या निधनाने हीच वेळ आज माझ्यावर आली आहे. अजितदादांसारखा सच्चा मित्र आणि सहप्रवाशाचा मृत्यू होणे, ही केवळ राजकीय हानी नाही. ही आपल्या सर्वांच्या अंत:करणाला वेदना देणारी गोष्ट आहे. काही गोष्टींवर काळ औषध असतो, असे म्हणतात. पण अजितदादांच्या निधनामुळे झालेल्या वेदना कधीही कमी होणाऱ्या नाहीत.
अजित पवार हे कठोर निर्णय घेणारे अर्थमंत्री होते, परंतु लाडकी बहीण योजनेसारख्या जनहितकारी निर्णयांसाठी ते वित्त विभागाच्या आक्षेपांनाही जुमानले नाहीत. या योजनेनंतर त्यांनी गुलाबी रंगाचे जॅकेट घालण्यास सुरुवात केली होती आणि इतरांनाही ते घालण्यासाठी प्रोत्साहन दिले होते. अजितदादांच्या निधनामुळे संपूर्ण सभागृह दु:खी आहे. खरंतर अशाप्रकारचा शोकप्रस्ताव मांडणं घटनात्मक जबाबादारी आहे. माझ्यासाठी हा भावनिक प्रसंग आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.