आजपासून महाराष्ट्र राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अजित पवार यांच्या निधनाबद्दल दोन्ही सभागृहात शोकप्रस्ताव मांडण्यात आला. दिवंगत नेते अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावेळी त्यांचे पुतणे आणि आमदार रोहित पवार हे भावूक झाल्याचं दिसून आलं. अजित पवारांच्या आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यातून अश्रू आले.
रोहित पवारांनी अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीला उजाळा देत त्यांच्याबद्दल अनेक घटना सांगितल्या. रोहित पवार म्हणाले की, "एकदा अजितदादा मला म्हणाले होते की, रोहित तुझ्या झिपऱ्या वाढल्यात, त्या कमी कर. दादा गेले त्या दिवशी त्यांना आदरांजली म्हणून मी केस कापले. अजितदादा नेहमी मला म्हणायचे की, तुझं शारिरीक वजन वाढलंय. शारिरीक वजन कमी कर आणि राजकीय वजन वाढव. मी त्यावर फक्त हो म्हणायचो. मी अजितदादांना शब्द देतो. माझी हेअरस्टाईल अशीच ठेवेन. शारिरीक वजन कमी करेन, राजकीय वजन वाढवेन."
अजितदादा मला म्हणायचे, वरचं बटण लावत जा. पण एक मात्र मी सांगतो, चाळीस-पन्नास वर्षानंतर मी ज्यावेळी अजितदादांना भेटायला जाईन, तोपर्यंत मी माझं बटण असंच उघडं ठेवणार. कारण हे वरचं बटण तुमची मला रोज आठवण देत राहील असं रोहित पवार म्हणाले. रोहित पवार पुढे म्हणाले की, "एक सांगतो, चाळीस-पन्नास वर्षानंतर ज्यावेळी कधी तुमची भेट होईल, तेव्हा हा माझा लढा सुरू आहे त्यामुळे त्यांच्यासमोर मी ताठ मानेने उभा राहीन. त्यावेळी काका माझ्या पाठीवर हात ठेवून म्हणतील, लढलास बरं का! या गोष्टी ऐकण्यासाठी मी हा लढा सुरू ठेवलाय.
दादांच्या अपघातासाठी जो कुणी दोषी असेल, मग तो कितीही मोठा असेल त्याला तुरुंगात टाकल्याशिवाय आणि शिक्षा दिल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही."काकी, तुमच्या राजकीय प्रवासामध्ये तुमच्या पुतण्याची ज्यावेळी गरज लागेल त्यावेळी मी तयार असेन असं आश्वासनही रोहित पवारांनी दिलं.