राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा २८ जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला. त्यांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांचे 28 जानेवारीला निधन झाल्यावर दुसऱ्याच दिवशी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठान येथील मैदानात त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते. त्यानंतर लगेच 30 तारखेला अजित पवार यांचा अस्थी सावडण्याचा कार्यक्रम पार पडला होता.
२८ जानेवारीला अजितदादांच्या निधनानंतर येत्या 6 जानेवारीला त्यांचा दशक्रिया विधी होणे अपेक्षित होते. मात्र, अजित पवार यांचा दशक्रिया विधी अगोदरच पार पडल्याची माहिती त्यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी प्रसारमाध्यमांना दिली. त्यामुळे आता इथून पुढे अजित पवार यांचा कुठलाही विधी होणार नाही, अशी माहिती श्रीनिवास पवार यांनी दिली.
कुटुंबीयांनी अस्थि विसर्जनाच्या वेळीच आवश्यक ते सर्व विधी पूर्ण केले आहेत. त्यामुळे आता 10 व्या किंवा 13 व्या दिवसाचा कोणताही सार्वजनिक किंवा धार्मिक विधी आयोजित केला जाणार नाही, असे श्रीनिवास पवार यांनी सांगितले. या सगळ्यावर अजित पवारांच्या कुटुंबीयांकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया समोर आली नाही. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार किंवा जय पवार यांनी याबाबत कोणतीही माहिती दिली नाही. श्रीनिवास पवारांनी पवार कुटुंबीयांशी चर्चा करूनच ही माहिती दिल्याचे समजते.