उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यनंतर आमदार अमोल मिटकरी अनेक शंका उपस्थित करत आहे. या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. मात्र विमानात सहा जण असताना पाच मृतदेह कसे मिळाले? सहावा व्यक्ती कुठे गेला? असा प्रश्न अमोल मिटकरींनी विचारला.
अजित पवारांच्या मृत्यूदिवशी संध्याकाळी पाच वाजता घटनास्थळी गेलो असता तेथील सरपंचाने धक्कादायक माहिती दिल्याचे अमोल मिटकरी म्हणाले. त्यांनी सांगितले की, "घटनेच्या दिवशी अंत्यविधी आटोपल्यानंतर आपण घटनास्थळी पोहोचलो. त्या ठिकाणचे सरपंचांनी सांगितलं की, कुणीतरी त्या विमानातून उडी मारण्याची धडपड करत होते. आम्ही त्याला वाचवण्यासाठी गेलो असता त्याचा मोठा स्फोट झाला. डीजीसीए म्हणतंय सहा जणांचा मृत्यू झाला, मात्र त्या ठिकाणी पाच मृतदेह सापडले. याची चौकशी झाली पाहिजे."
दरम्यान, गोजुबावीचे सरपंच कल्याण आटोळे यांनी हा अपघात प्रत्यक्ष पाहिल्याचा दावा केला. अपघातावेळी विमानाचा दरवाजा उघडा असल्याची त्यांनी माहिती दिली. निळी पँट घातलेला व्यक्ती बाहेर येतोय असं आधी वाटलं, पण नंतर तसं काही दिसलं नाही. तसेच हे विमान अजितदादांचे होते याची आम्हाला माहिती नव्हती, ते एखाद्या उद्योगपतीचे असेल असं वाटलं होतं.
सरपंच कल्याण आटोळे यांनी या प्रकरणी शरद पवारांची भेट घेतली आणि त्यांना सगळी माहिती दिली. विमानाने आधी दोन वेळेस घिरट्या घातल्या आणि नंतर खाली येत असताना हा अपघात झाला असा दावा त्यांनी केला. दरम्यान, अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेकांनी शंका व्यक्त केली असून त्याची चौकशी करण्याची मागणी केली आहे. या प्रकरणाची केंद्रीय स्तरावर चौकशी सुरू करण्यात आली आहे.