पुणे : विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात सर्वत्र प्रचार, सभा, दौरे होत असल्याचं चित्र आहे. निवडणुकीसाठी उभा असलेला उमेदवार आणि त्यांच्या पक्षासह संपूर्ण कुटंब देखील प्रचारात उतरल्याचं दिसून येत आहे. अशातच बारामती मतदारसंघात अजित पवार विरूध्द पुतण्या युगेंद्र पवार अशी लढत होणार आहे.
या निवडणुकीच्या अनुषंगाने पवारांचं अख्ख कुटूंब युगेंद्र पवारांचा प्रचार करताना दिसत आहे. शरद पवार, सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार त्यांचे आई वडिल यांच्यासह पहिल्यांदाच प्रचारामध्ये शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या देखील मैदानात उतरल्या आहेत. त्या बारामती मतदारसंघात ठिकठिकाणी जात आहेत, लोकांना भेटत आहेत. युगेंद्र पवारांचा प्रचार करत आहेत, यावर अजित पवारांनी आज बारामतीच्या दौऱ्यावर असताना भाष्य केलं आहे.
निवडणूक प्रचारासाठी अजित पवार गावभेट दौरा करत असताना अजित पवार यांनी त्यांच्या काकी प्रतिभा पवार यांचं नाव घेत काय नातवाचा पुळका आलाय कळेना, असं म्हणत अजित पवारांनी प्रतिभा पवार प्रचारावरून टीका केली आहे. 'मी समोरच्यावर टीका करायला गेलो, तर तो माझा पुतण्या आहेत. मला तो मुलासारखा आहे. पुन्हा आम्हीच आमच्या घरातल्यांवर एकमेकांवर टीका करतोय असं होईल. ते मला करायचं नाहीये. मी पुन्हा सांगतो की भावनिक होऊ नका, असं आवाहन त्यांनी मतदारांना यावेळी केलं आहे.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
अजित पवार आज बारामतीमध्ये गावभेट दौरा करत आहेत, बारामती मधील पानसरे वाडी,जळगाव सुपे, कऱ्हावागज, काऱ्हाटी आणि अंजनगाव या गावांचा अजित पवार गावभेट दौरा करणार आहेत. गावभेट दौऱ्या दरम्यान अजित पवार यांनी त्या भागातील शेतकरी आणि महिलांसाठी त्याचबरोबर इतर योजनांची माहिती दिली, केलेल्या कामांचा आढावा सर्वांसमोर मांडला, भविष्यातील योजना, आणि कामांची माहिती दिली, त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, लोकसभेला गंमत केली आता विधानसभेला गंमत करू नका. नाहीतर तुमची जंमत होईल. बारामतीकरांना पुन्हा वाली राहणार नाही. साहेब दीड वर्षांनी निवडणूक लढविणार नाहीत. शरद पवार यांचा मोठा फोटो लावला जात आहे. काय नातवाचा पुळका आलाय कळेना, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, 'मला तुम्ही 91 पासून आमदार-खासदार केलं. तेव्हापासून प्रतिभाताई कधी बाहेर आल्या आहेत का? आत्ताच का? काय नातवाचा पुळका आलाय काय माहिती नाही. जर मी खाताडा, पेताडा, गंजाडी असतो तर गोष्ट वेगळी होती. त्यांनी वाटोळं केलं बारामतीचं, फार बाद झाला, याच्या हातात बारामती दिली तर वाट लावेल असं काही असतं तर गोष्ट वेगळी असती. मी काकींना एकदा निवडणूक झाल्यानंतर विचारणार आहे की काय त्या नातवाचा एवढा पुळका आला होता तुम्हाला. आत्ता विचारण्याची वेळ नाही', असंही पुढे अजित पवार म्हणालेत.