बीड जिल्ह्यातील सतीश भोसले उर्फ खोक्या याच्या गुन्हेगारी कृत्यांची मागील आठवडाभर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. याचाच आधार घेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतंच एक वक्तव्य करत विधानसभेत निवडून आलेल्या आमदारांना टोला लगावला.
काय म्हणाले राज ठाकरे?
"तुम्ही एका खोक्याभाईचे काय घेऊन बसला आहात सर्व विधानसभा खोक्याभाईंची आहे," अशा शब्दांत राज यांनी महायुतीला टोला लगावला होता.
राज ठाकरेंच्या या टीकेला आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोचरा सवाल विचारत प्रत्युत्तर दिलं आहे.
राज ठाकरेंनी आमदारांबाबत खोक्याभाई शब्द वापरून केलेल्या टीकेबद्दल तुमची प्रतिक्रिया काय, असा प्रश्न पत्रकारांकडून अजित पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावर "तुम्ही कधी निवडून आलाय का?" असं म्हणत अजित पवार यांनी मनसेच्या निवडणुकांतील अपयशावर बोट ठेवलं आहे.
दरम्यान, अजित पवार यांनी राजकीय अपयशाचा मुद्दा उपस्थित करत डिवचल्यानंतर आता राज ठाकरेंकडून कसा पलटवार केला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.