राज्यात सध्या पोलीस भरती सुरु आहे. अनेक तरुण- तरुणी वर्दीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रचांफा मेहनत घेत आहे. अशातच बुलढाण्यातून हृदयद्रावक घटना समोर आली आहे. बीडमधील घटना ताजी असतानाच बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील सारशिव येथील एका १९ वर्षीय तरुणाचा धावण्याचा सराव करताना मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दीपक रामदास जाधव असे या दुर्दैवी तरुणाचे नाव असून, तो आपल्या कुटुंबाचा एकुलता एक आधार होता.
प्राथमिक माहितीनुसार, दीपकची १३ फेब्रुवारी रोजी मुंबई येथे शारीरिक चाचणी (ग्राउंड टेस्ट) होती. या चाचणीच्या पूर्वतयारीसाठी तो १२ फेब्रुवारी रोजी मंगळूर नवघरे परिसरात सराव करत होता. धावत असताना अचानक त्याला छातीत कळा जाणवू लागल्या आणि तो जागीच कोसळला. तिथे असलेल्या मित्रांनी त्याला तातडीने मदत करण्याचा प्रयत्न केला, मात्र उपचारापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.
दीपकच्या पश्चात आई-वडील आणि दोन बहिणी असा परिवार आहे.दोन दिवसांपूर्वी बीडमध्येही १६०० मीटर धावण्याची चाचणी पूर्ण केल्यानंतर दीपक वाव्हळे या तरुणाचा मृत्यू झाला होता.