बीड जिल्ह्यात मागच्या काही दिवसापासून खुनाच्या अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. या घटनांनी जिह्यातील नागरिकात तणाव निर्माण झाला आहे. शहरात रात्री शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत मित्रांमध्ये झालेल्या वादाने टोक गाठलं. संतप्त झालेल्या मित्राने विजय काळे याच्यावर धारदार तीक्ष्ण हत्याराने वार केले. या घटनेनंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र स्थानिक पोलिसांनी त्याला १२ तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी मध्यरात्री विजय काळे याची हत्या करण्यात आली. विजय हा दोन वाजता गणपतीच्या समोर मित्रांसोबत डान्स करत होता. या डान्सचा व्हिडीओ त्याने नंतर सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यानंतर काहीच वेळात त्याचा मित्र अभिषेक गायकवाड याच्यासोबत किरकोळ वाद झाला. या वादातून अभिषेकने विजयच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केला. रक्ताच्या थारोळ्यात तो गंभीर जखमी अवस्थेत कोसळला. स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्याला तातडीने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. एका किरकोळ कारणावरून तरुणाचे आयुष्य निर्दयपणे संपवले गेले.
घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. पोलिसांनी गुन्ह्याच्या तपासात गती दाखवत अवघ्या बारा तासांच्या आत आरोपींना ताब्यात घेतले. तथापि, नेमक्या कोणत्या कारणावरून वाद निर्माण झाला, आणि त्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणात तणाव वाढून हत्येचा प्रकार घडला, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही.